महापालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयाेगाची रक्कम अदा करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असली तरी आर्थिक उत्पन्न लक्षात घेता सदर रक्कम अदा करताना प्रशासनाची दमछाक हाेत आहे. सहाव्या वेतन आयाेगापाेटी प्रशासनाला सेवारत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तब्बल ३० काेटी रुपये अदा करावे लागतात. मनपाच्या विविध विभागात माेठ्या पदांवर ठाण मांडून बसलेले तसेच कर्मचारी संघटनेच्या आडून दबावतंत्राचा वापर करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतनाची किमान ५० टक्के रक्कम पदरात पाडून घेतली आहे. त्याउलट आजारपण, मुलांचे शिक्षण व लग्नकार्यासाठी पैशांची आवश्यकता असणाऱ्या गरजू कर्मचाऱ्यांची नेहमीच बाेळवण झाल्याचे दिसून येते. हा प्रकार लक्षात घेता मनपात सेवारत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या फरकाच्या रकमेतून किमान पाच हजार रुपये दरमहा त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आयुक्त निमा अराेरा यांनी घेतला आहे. तसा आदेश आयुक्तांनी जारी केला आहे.
कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार !
ज्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत सहाव्या वेतन आयाेगाची ५० टक्के रक्कम अदा केली असेल त्यांची व ज्या कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी अथवा रक्कमच मिळाली नाही, अशा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे अशा कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये यानुसार ५० टक्के रक्कम अदा केली जाईल. सर्वांना समान रक्कम अदा झाल्यानंतरच पुढील रक्कम समानतेच्या धाेरणानुसार अदा केली जाणार आहे.