अकोला: एटीएममधून रक्कम काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाने सर्व सोपस्कार पूर्ण केले; परंतु एटीएम मशीनमधून रक्कम निघालीच नाही. तरीही त्यांच्या खात्यातून स्टेट बँकेने तीन हजार रुपये केले, तसा संदेशही त्यांना आला. यासंदर्भात ग्राहकाने तक्रार निवारण मंचाकडे याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना, ग्राहक तक्रार मंचाने स्टेट बँकेला ग्राहकास नुकसान भरपाई देण्याचा आदेश शुक्रवारी दिला.शहरातील बिर्ला कॉलनीत राहणारे तक्रारकर्ते बसंतकुमार पंडित यांचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. २७ मे २0१८ रोजी ते टिळक रोडवरील युनियन बँकेच्या एटीएमवर गेले. त्यांनी सर्व सोपस्कार करून तीन हजार रुपये काढण्यासाठी अंक टाकले; परंतु बराच वेळ उलटूनही रक्कम एटीएम मशीनमधून बाहेर आलीच नाही. उलट त्यांच्या मोबाइलवर त्यांच्या बँक खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा संदेश आला. काही तासांनंतर रक्कम खात्यात जमा होईल, असे त्यांना वाटले; परंतु त्यांच्या खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम बँकेने जमा केली नाही. यासंदर्भात त्यांनी स्टेट बँकेकडे तक्रार केली; परंतु बँकेने त्यांची दखल घेतली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही बँकेने बसंतकुमार पंडित यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने दोन्ही बँकांना नोटीस बजावल्या. या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष श्रीमती एस. एस. उंटवाले, सदस्य सोनवणे यांनी बँक व तक्रारकर्त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर युनियन बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँक टॉवर चौक यांनी तक्रारकर्त्यास तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्याची बाजू अॅड. मनीष खरात, अॅड. धनंजय वानखडे, अॅड. जयेश गावंडे व अॅड. सविता वानखडे यांनी मांडली. (प्रतिनिधी)