अकोला : अमरावती-चिखली या जुन्या मार्गाची तात्पुरती डागडुजी आगामी जून २०१९ च्या आत केली जाणार आहे. त्यासाठी दोन कंत्राटदारांची निवडही करण्यात आली आहे, अशी माहिती चौपदरी मार्गाचे प्रकल्प प्रमुख विलास ब्राह्मणकर यांनी दिली. अमरावती-चिखली चौपदरी मार्गाची स्थिती आणि जुन्या मार्गाच्या डागडुजी संदर्भात अकोल्यातील उद्योजक विनय बाछुका यांनी केलेल्या विचारणेवर ब्राह्मणकर यांनी ही माहिती दिली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती-चिखली चौपदरी मार्गाच्या स्थितीबाबत अकोल्यातील उद्योजक विनय बाछुका यांनी मुंबईला पत्र पाठवून सद्यस्थिती आणि कामकाजासंदर्भात विचारणा केली. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत ठळक माहिती देण्यात आली आहे. अमरावती-चिखलीच्या चार वर्षांच्या कामाची माहिती त्यात नमूद करण्यात आली. आय.एल. अॅण्ड एफ.एस. कंपनीने बंद पाडलेले काम, बीओटी मोडवर अमलात आणले जाणारे टोलनाके आणि इतर बाबींची माहितीही त्यात देण्यात आली आहे. जुना रस्ता सुरक्षा सुधारणा आणि पॅचेस डागडुजीसाठी दोन कंत्राटदार नेमले असून, अकोल्यातील ओबेराय कन्स्ट्रक्शनला आणि यवतमाळच्या अवद्यैर्य कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आल्याचेही सांगितले गेले आहे. दोन्ही कंत्राटदारांकडून जून २०१९ च्या आत काम पूर्ण करून घेतले जाणार आहे.