संतोष वानखडे/वाशिम : शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेपैकीच एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारल्या गेली आहेत. अमरावती विभागात मात्र एकही हरितगृह उभारल्या गेले नाही. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने अपेक्षीत उत्पादन हाती येत नसल्याने शेतीत नानाविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांना शासनाच्या अनुदानित योजनांमुळे ह्यअर्थह्ण प्राप्त होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारण्यात आली आहेत. पिकांसाठी वातावरण नियंत्रित करण्यात हरितगृह महत्त्वाची भूमिका बजावतात. तापमान नियंत्रित करणे, कॉर्बन डायऑक्साईड व किड नियंत्रण आदी बाबी हरितगृहांमुळे सहज शक्य होतात. भाजीपाला आणि फळबाग उत्पादक शेतकर्यांसाठी हरितगृह महत्त्वाची ठरत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक या विभागात फळबाग व भाजीपाला उत्पादन मोठय़ा प्रमाणात असल्याने हरितगृह ही संकल्पना येथे पूर्णत: रूजली आहे. हरितगृहासाठी खर्चही जास्त असल्याने आणि अमरावती विभागात मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यात हरितगृह उभे राहू शकले नाहीत.
हरितगृहातून अमरावती विभाग गायब
By admin | Published: August 21, 2015 12:08 AM