- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत. विभागात १०६९ विषबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यातील तिघे अकोला जिल्ह्यातील आहेत. ही बाब कृषी, आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक, जनजागृतीपर उपाययोजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.ऊस पिकासाठी शिफारस केलेली कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीच्या निदर्शनास आले होते. चालू वर्षातही अकोला जिल्ह्यात २९१ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती विभागात १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या काळात १०६९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. विषबाधेच्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यूही झाला आहे. ६ विषबाधितांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यापैकी बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधितांची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली. इतर जिल्ह्यातील माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार आकडेवारी देण्यात आली आहे.