अकोला : विभागात कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचाही प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत विभागात म्युकरमायकोसिसचे २३४ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १०४ रुग्णांवर सद्य:स्थितीत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ११७ रुग्णांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे, तर १३ जणांचा बळी गेला आहे. विभागात आतापर्यंत सर्वाधिक १०८ रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर उपचार सुरू असलेल्या विशेषत: मधुमेहाच्या कोविडग्रस्त रुग्णांना या बुरशीजन्य आजाराचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. विभागात याचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यात बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमरावतीमध्ये आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १०८ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६६ रुग्णांनी आजारावर मात केली असून, ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव लक्षा घेता कोविडच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय रुग्णांची स्थिती
जिल्हा - एकूण रुग्ण - उपचार सुरू - बरे झाले - मृत्यू
अकोला - ६८ - ३२ - ३१ - ०५
अमरावती - १०८ - ४१ - ६६ - ०१
बुलडाणा - ३६ - १७ - १५ - ०४
वाशिम - ०९ - ०२ - ०५ - ०२
यवतमाळ - १३ - १२ - ०० - ०१
ही घ्यावी काळजी
नाकाची नियमित स्वच्छता ठेवा.
दातांची स्वच्छता राखा.
तोंडामध्ये खाद्यपदार्थ चिकटून राहू देऊ नका.
नाक, डोळे आणि दातांची निगा राखा.
त्रास जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
म्युकरमायकोसिस एक प्रकारचा बुरशीजन्य आजार असून, त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार होतात. अनेक रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र, आवश्यक खबरदारीची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, उपसंचालक, अकोला मंडळ, आरोग्य सेवा