लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व प्रकारच्या दारू विक्रीवर बंदी घातल्यानंतर अवैधरीत्या दारू विक्रीला उधाण आले आहे. याचा फायदा बनावट दारू निर्मात्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली मध्यप्रदेशातील बनावट दारूची विक्री सध्या जोमात असून, अमरावती हे अशी दारू विक्री करण्याचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले आहे.खदान परिसरातील सचिन हिरामण रोकडे याच्या घरातून पोलिसांनी २९ जूनच्या रात्री १ लाख ६३ हजार रुपयांचा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त केला. रोकडे याने महाराष्ट्रात बंदी असलेली मध्य प्रदेशातील बॉम्बे विस्की आणून आणि त्यात लाल रंग मिसळून ती दारू ब्रॅण्डेड कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा अवैध व्यवसाय घरीच सुरू केला होता. या प्रकरणात सचिन रोकडे हा घरातून फरार झाला होता. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून सचिन रोकडे हा बनावट दारू निर्मितीची माहिती घेऊन आला असून, काही महिन्यांपूर्वीच त्याने हा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. मध्य प्रदेशातून दारू आणायची आणि ही दारू विविध ब्रॅण्डेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरायची. हे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना खदान पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवार, ६ जुलै रोजी अमरावती येथून अटक केली आहे. अवैध दारुविक्रेत्यांनी चक्क मध्यप्रदेशातील बनावट दारुविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे थाटला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात सहजतेने बनावट ब्रॅण्डेड विदेशी दारु आणून विकली जात आहे. तसेही वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्याने मध्यप्रदेशातील दारुविक्रेत्यांनी वर्धेला लक्ष्य केले आहे. मध्यप्रदेशातून बनावट दारूची वाहतूक करून ती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वर्धा, अमरावती जिल्ह्यात पुरवली जाते.मध्यप्रदेशातील बनावट दारूचा नियमबाह्य व्यवसाय करण्यासाठी अमरावती, वर्धा, नागपूर व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर अनेकांनी शेतात गोदाम बनविले आहे. चोरट्या मार्गाने बनावट दारूची वाहतूक करून ती गोदामात साठवून ठेवली जाते. अकोला आणि यवतमाळ येथे विदेशी दारुविक्रीचे ठोक विक्रेते असून, मध्यप्रदेशातील बनावट दारूच्या बाटलीवर प्लास्टिकचे स्टिकर काढून ही दारु अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून विदर्भातील हॉटेल, ढाबे, बियरबार, वाईन शॉपवर पोहोचविली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.उत्पादन खर्च कमी, चवीची हमीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू झालेल्या दारूबंदीमुळे मद्यपींना दारूकोणतीही असो ती हवीच, याप्रमाणे मध्यप्रदेशातील बनावट दारूची चवदेखील आता त्यांना ब्रॅण्डेड विदेशी दारुप्रमाणे वाटू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिशय कमी दरात आणली जात असलेली मध्यप्रदेशातील बनावट दारु ही चढ्या दरात विकली जात आहे.अमरावतीतही झाली कारवाई मध्यप्रदेशातून बनावट दारूची अमरावती जिल्ह्यात वाहतूक होत असताना एकट्या जून महिन्यात साडेतीन लाखांची दारू पकडण्यात आली आहे. अचलपूर, पांढुर्ण्यातून बनावट दारू जप्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. चार जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.दोघांची पोलीस कोठडीत रवानगीबनावट दारू विक्रीप्रकरणी खदान पोलिसांनी अमरावतीच्या प्रदीप राजेंद्र देवताडे (२४)आणि श्रीकांत बाळासाहेब सोनोने (२२) दोघांना अटक केली आहे. या आरोपींकडून नामांकित दारूच्या कंपनीचे झाकण जप्त करण्यात आले असून, या गोरखधंद्याच्या म्होरक्याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान, या दोघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर दोघांची एक ा दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली. फरार झालेल्या सचिनला ताब्यात घेतल्यानंतर बनावट दारूचे हे जाळे बुलडाणा, मेहकर आणि अमरावतीपर्यंत विस्तारले असल्याचे समोर येत आहे. ही कारवाई ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेच्या पोलिसांनी केली.
बनावट दारू पुरवठ्यासाठी अमरावती महत्त्वाचे केंद्र!
By admin | Published: July 07, 2017 1:39 AM