अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शासकीय यंत्रणांच्या उदासीन धोरणामुळे निष्पाप वाहनधारकांचे हकनाक बळी जात असल्याचा मुद्दा शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला असता, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी उत्तर देताना सारवासारव करावी लागली. तूर्तास निधी नसल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.अमरावती-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्याची मुदत २०१९ मध्ये संपणार आहे. असे असताना आजपर्यंत कंत्राटदाराने महामार्गाचे केवळ २५ टक्के काम केले असून, मागील काही महिन्यांपासून कामही बंद आहे. अशा परिसस्थितीत हा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात निधीची कमतरता असल्याचे मान्य केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे काम करीत आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतच्या १९४ किमीपैकी २५ टक्के काम पूर्ण झाले असून, आयएल अॅन्ड एफएस कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे सदर काम थांबल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. चिखली ते फागणे (गुजरात) या १५० किमी टप्प्यापैकी केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले असून, या कामातही आर्थिक अडचण असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कळवले आहे. तथापि, हे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.उनखेड येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी?मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड येथील शेतकऱ्यांना २०१३ च्या सुधारित भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला दिला नसून, प्रकल्प बाधित प्रमाणपत्रेसुद्धा दिली नाहीत. ठरल्यानुसार नदी पात्रात सिमेंट रस्ता बांधला नसल्याने शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासन येथील शेतकºयांना कधी न्याय देणार, असा सवाल आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. त्यावर २९ मार्च २०१९ पासून उमा नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला असून, ३ मार्चपासून उनखेड येथील पूर संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निकषानुसार बाधित शेतकºयांना मोबदला दिल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.