अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विशेष पेट परीक्षा २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्वत परिषदेच्या ६.६.२०१७ च्या निर्णयानुसार यापूर्वी ‘जनरल अॅप्टीट्यूड’ हा पेपर देऊन पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता या परीक्षेंतर्गत विषयनिहाय दुसरा पेपर घेण्यात येणार आहे. विषयनिहाय दुसऱ्या पेपरकरिता आयन डिजिटल झोन एमएस विन्सार इंफोटेक लेन सी, सिंध होजियरीजवळ सिटीलँड ट्रेडींग हब, नागपूर-अमरावती महामार्ग, अमरावती या केंद्रावर दुपारी २ ते २.४५ पर्यंत सदर परीक्षा होणार आहे. हा पेपर पेट नियम १/२०१७ नुसार संबंधित विषयाच्या पदव्युत्तर पदवी (पी.जी.कोर्स) करिताच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे.या परीक्षेकरिता एकूण ३२५ विद्यार्थी पात्र ठरले असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे विद्यार्थी आपले प्रवेश पत्र प्राप्त करू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश पत्र आणि फोटो आयडीसह नमूद परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रात नमूद सूचनांनुसार केंद्रावर वेळेवर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एच.आर. देशमुख यांनी केले आहे. नियोजित वेळेनंतर केंद्रावर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.