अकोला: उत्कृष्ट अभिनय अन् दिग्दर्शनाने नटलेल्या अमरावती शाखेची ‘पारो’ ही एकांकिका कै. लक्ष्मणराव देशपांडे स्मृती एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी या एकांकिकेची निवड करण्यात आली, तर द्वितीय स्थान अकोला शाखेच्या ‘लास्ट प्ले’ या एकांकिकेने पटकावला.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईद्वारा आयोजित आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अकोला शाखा तथा मलकापूर-अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजनात शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षक मंगेश नेहरे (मुंबई), डॉ. गणेश शिंदे (औरंगाबाद) यांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्ज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई केंद्रीय शाखेचे सहसचिव अशोक ढेरे, मलकापूर-अकोला शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, अकोला शाखेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी उपस्थित होते.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अमरावती शाखेने सादर केलेली ‘पारो’ ही एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. सोबतच याच एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी वैभव देशमुख प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. अकोला शाखेने सादर केलेल्या ‘लास्ट प्ले’ द्वितीय ठरली. दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार अनिल कुलकर्णी यांना मिळाला.सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरुष गटात प्रथम क्रमांक- अभिषेक खेडकर (‘लाल सलाम’, कारंजा शाखा), द्वितीय- मिलिंद कुलकर्णी (‘लास्ट प्ले’ अकोला शाखा) तर उत्तेजनार्थ- अनिल कुलकर्णी यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनय महिला गटात प्रथम क्रमांक - वैष्णवी बडगे (पारो), द्वितीय- गिरिजा पातूरकर (पारो) तर उत्तेजनार्थ- दिव्या स्थूल (पारो) यांनी पटकावला.