अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर- अकोला शाखा व श्री. शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक’ एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृतात पार पडली. या स्पर्धेत अमरावतीचा समीर भराणे हा ‘गणलक्ष्मी करंडक’ चा मानकरी ठरला.पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते, तर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. प्रा. एम. टी. ऊर्फ नाना देशमुख, डॉ. चंद्रकांत शिंदे (अमरावती), प्रा.डॉ. अमोल देशमुख एमआयटी (पुणे) ही परीक्षकत्रयी तथा अकोला- मलकापूर शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन नारे व अध्यक्ष तथा स्पर्धा संयोजक प्रा. मधू जाधव रंगमंचावर उपस्थित होते.पारितोषिक वितरण सोहळ्यात यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावतीचा समीर भराणे याला ‘गणलक्ष्मी करंडक’ व रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतिप्रीत्यर्थ रुपये ५,५५५ रोख प्रथम पारितोषिक, तर साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ रुपये ३,३३३ रोख स्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार धुळ्याच्या शशिकांत नागरे यास तर वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ रोख रुपये २,२२२ व स्मृतिचिन्ह तृतीय पुरस्कार नागपूरच्या प्रा.डॉ. संगीता टेकाडे-ढोबळे यांना प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ रंगकर्मी दादा रत्नपारखी स्मृतिप्रत्यर्थ प्रत्येकी रोख रुपये ५०१ असे उत्तेजनार्थ चार पुरस्कार - अरविंद उचित (वाशिम), आरती बानोकर (अकोला), वैष्णवी बडगे (अकोला), अशोक काळे (अमरावती) यांना प्रदान करण्यात आले. अरुण घाटोळे पुरस्कृत लक्षवेधी ‘श्याम-कमल’ पुरस्कार रुपये ५०१ डॉ. सुनील गजरे यांना, तर डॉ. चंद्रकांत शिंदे पुरस्कृत परीक्षक पुरस्कार प्रत्येकी रोख रुपये ५०१ अथर्व रानडे (वाशिम), मंगल मशाखेत्री (चंद्रपूर) यांना देण्यात आले.स्पर्धेच्या प्रारंभी प्रा. एम.टी. देशमुख अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कथ्थक नृत्य मंदिराच्या नृत्यशिष्याच्या गणेश वंदना प्रस्तुतीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रा. संजय खडसे तथा अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी आपले मार्गदर्शनपर विचार प्रकट केले. परीक्षकांचे मनोगत चंद्रकांत शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पुरस्कारांची घोषणा स्पर्धा आयोजक प्रा. मधू जाधव यांनी केली.