अकोला - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्यातूनच, आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या सगळ्या कारस्थानामागे भाजपचा हात असल्याचे शिवसेनेकडून सांगणयात येत आहे. त्यावरुन, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. या टिकेला आता शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गट आणि भाजपकडूनही शिवसेनेसह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच, अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. अमृता फडणवीसांच्या या टिकेला शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'आमची चिंता आम्ही करू' असे म्हणत अमृता फडणवीसांच्या टिकेवर सत्तारांनी पलटवार केला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ झाली, यासंदर्भात विचारणा केली असता. अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे, ते कुठेही गेले तरी तसेच वागणार, अशा शब्दात दानवे यांनी सत्तांरांना टोला लगावला आहे.
अमृता फडणवीसांनी काय म्हटले होते.
अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला सर्वांत मोठा धक्का नेमका कशाचा बसलाय, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारत अमृता फडणवीस यांनी ४ पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवणे, दुसरा पर्याय म्हणजे ४० आमदार आणि १२ खासदार गमावणे, तिसरा पर्याय म्हणजे प्रदीर्घ काळापासून असलेला भाजपसारखा निष्ठावान युती भागीदार गमावला आणि चौथा पर्याय कट्टर उजव्या विचारसरणीचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे, असे चार खोचक पर्याय देत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याचे सांगितले जात आहे.