अकाेला: ‘अमृत’अभियानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या याेजनांची वर्तमानस्थिती, अदा केलेले देयक, मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत, तसेच गतवर्षभरातील सर्वसाधारण सभेतील कामकाजाचा इत्थंभूत गाेषवारा सादर करण्याचे नगर विकास विभागाचे पत्र महापालिकेत धडकताच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदर पत्र प्राप्त हाेताच माहिती संकलीत करताना मनपाची धांदल उडाली आहे.
केंद्र शासनाने ‘अमृत’अभियान अंतर्गत भूमिगत गटार याेजना, पाणी पुरवठा याेजना निकाली काढली जात आहे. उपराेक्त निधीतून विकास कामांची स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. या व्यतिरिक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीची माहिती सादर करण्याचीही सूचना आहे. केंद्र व राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी काेट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही शहरांमधील अस्वच्छतेची समस्या कायमच असल्याचे चित्र दिसून येते. घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाकडून काेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, यासंदर्भात माहिती सादर करावी लागणार आहे. शहरात काेट्यवधींच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांचे अवघ्या सहा महिन्यात पितळ उघडे पडले. याबद्दल सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश आहेत.
नगररचना विभागावर करडी नजर
नगररचना विभागातील अंदाधुंद कारभाराची दखल घेत शासनाने या विभागामार्फत वाणिज्य संकुल,रहिवासी सदनिका (अपार्टमेंट)तसेच आजवर मंजूर केलेल्या ले-आऊटची सर्व माहिती सादर करण्याचे सूचित केले आहे. मागील काही दिवसांपासून मनपाच्या नगररचना विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत करून काही बांधकाम व्यावसायिक व नगरसेवकांनी मनमानी कारभार चालविल्याचा आराेप आहे.
शासनाने मागितले सभेचे इतिवृत्त
महापालिकेत २०१४ पासून भाजप सत्तास्थानी आहे. काही सभांंमध्ये सत्तापक्ष चर्चा न करताच विषय सूचीवरील विषयांना मंजुरी देत असल्याचा शिवसेनेचा आक्षेप आहे. शिवसेनेने राज्य शासनाकडे २ जुलै, २९ सप्टेंबर व ३० ऑक्टाेबर राेजीच्या सर्वसाधारण सभेची तक्रार केली आहे. त्यामुळे सभेत मंजूर केलेले विषय व त्याचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
!