धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:25 PM2024-07-30T22:25:39+5:302024-07-30T22:29:01+5:30
अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Amol Mitkari ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केल्यामुळे आज मनसे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. मिटकरी हे अकोल्यातील शासकीय निवासस्थानी असताना मनसैनिकांनी बाहेर असलेली मिटकरींची गाडी फोडली. या तोडफोडीनंतर एक दुर्दैवी घटना घडली असून अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय मालोकर असं मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची आज दुपारच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनसेचे जे कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामध्ये जय मालोकर या तरुणाचाही समावेश होता. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या गोंधळानंतर जय मालोकर याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांना जयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.
दरम्यान, घरातील तरुण पोराचा अकाली मृत्यू झाल्याने मालोकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोणत्या वक्तव्यामुळे सुरू झाला होता वाद?
पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिले, असा चिमटा राज यांनी काढला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला होता.
राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना अमोल मिटकरी म्हणाले होते की, "सुपारीबहाद्दरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर बोलू नये. कारण टोलनाका, भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारीबहाद्दरांचे यशस्वी झालेलं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे," असा घणाघात मिटकरी यांनी केला होता.
दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या याच वक्तव्याचा निषेध करत अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आज मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता.