आशिष गावंडे/अकोला:मूलभूत सुविधा पुरविणे आणि महापालिका कर्मचार्यांच्या थकित वेतनासाठी प्रशासनाकडे बोट दाखविणार्या नगरसेवकांकडे मालमत्ता कर थकित आहे. त्यांनी जमा करावा, अन्यता मालमत्ता कर थकित ठेवणार्या नगसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा इशारा उपायुक्त माधुरी मडावी यांनी गुरुवारी दिला. मनपा क्षेत्रात १ लाख ३0 हजारांपेक्षा जास्त मालमत्ताधारक आहेत. यापैकी केवळ ४0 ते ४३ हजार मालमत्ताधारक मनपाकडे रीतसर कर जमा करतात. अर्थात उर्वरित मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे. एकीकडे प्रशासन मूलभूत सुविधा पुरवित नसल्याची सभागृहात ओरड करायची अन् दुसरीकडे प्रभागात पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या कर्मचार्यांना धाकदपट करायचा, अशी दुटप्पी भूमिका नगरसेवक घेतात. नागरिकसुद्धा अतिरिक्त पैसे जमा करावे लागतील, या विचारातून नगरसेवकांना मध्यस्थी करण्यास भाग पाडतात. या संपूर्ण प्रक्रियेमुळे करातून मिळणार्या मपाच्या उत्पन्नात फारशी वाढ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता, मालमत्ताकर जमा करण्याची सुरुवात नगरसेवकांकडून करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व नगरसेवकांना कर वेळेत भरण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. वेळ पडल्यास सक्ती करण्याची तयारीही प्रशासाने केली आहे. नगरसेवकांकडून कर जमा केल्याचा आदर्श घेऊन सर्वसामान्य नागरिकही कर जमा करतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. मालमत्ताकराचा भरणा न करणार्या नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची कठोर भूमिका घेण्याचा इशारा उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिला आहे.
..तर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई
By admin | Published: January 30, 2015 1:40 AM