खामगाव: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या युवा महोत्सवात गो.से. महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनातील उणिवा पहिल्याच दिवशी स्पष्टपणे समोर आल्या. सभागृहात साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. लोकनृत्याच्या पहिल्या स्पर्धेला महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. सभागृह अपुरे पडल्याने विद्यार्थ्यांंनी सभागृहाच्या खिडकीत लटकून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या महोत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ४00 पैकी ३00 पेक्षा जास्त महाविद्यालय सहभागी झाले आहेत. एका महाविद्यालयातील ४0 ते ४५ जणांची चमू सहभागी झाल्याने, गो.से. महाविद्यालयात पश्चिम विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांंची गर्दी लक्षात घेता, महाविद्यालयाने तसे नियोजन करायला हवे होते. सभागृहाच्या बाहेर मंडप टाकणे अपेक्षीत होते; मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंना चक्क सभागृहाबाहेर उभं राहून तसेच खिडकीला लटकून कार्यक्रमाचा आनंद घेण्याची वेळ आली होती. इतकेच नव्हे विद्यार्थ्यांंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात न आल्यामुळे अनेकांनी याबाबत रोष व्यक्त केला. तर एका महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांंना वितरीत केल्या जाणार्या पाणी पाऊचवरही आयोजक असलेल्या महाविद्यालयाने बंदी घातली. या विद्यार्थ्यांंना आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क गो.से.महाविद्यालयात लावण्यात आलेल्या पाणी बाटल्या आणि पाऊच विक्रीच्या स्टॉलचा रस्ता दाखविण्यात येत होता. तर महाविद्यालयातील मुत्रीघरांना कार्यक्रम सुरू असतानाच रंगरंगोटीचे काम सुरू होते. सभागृहात पंखे नसल्यामुळे मान्यवर, निमंत्रितांसह विद्यार्थ्यांंनाही चांगलाच त्रास सहन करावा लागला. लोकनृत्य स्पर्धेत मलकापूर येथील जनता महाविद्यालयाने कोळी गीत सादर केले; मात्र हे गीत चित्रपटातील असल्याची सबब पुढे करीत परीक्षकांनी अध्र्यावरच सादरीकरण थांबविले. नियमावली आधीच दिली असल्याने, तुम्ही हे गीत पुढे सादर करू शकत नाही, असे परीक्षकांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या जनता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी आपण यापूर्वी या गीताचे अमरावती विद्यापीठात सादरीकरण केले आहे.
*नियोजित वेळेपेक्षा दोन तासांचा विलंब!
नियोजनाच्या अभावामुळे कार्यक्रम पत्रिकेवरील वेळेपेक्षा तब्बल दोन तासांपर्यंंतचा विलंब सर्वच सभागृह आणि खोल्यांमधील स्पर्धा सुरू होण्यास लागला. उद्घाटन समारंभही नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरू झाला. उद्घाटन सोहळा पार पडलेल्या सभागृहात पंखे नसल्याचेही विद्यार्थ्यांंसह मान्यवरांनी अधोरेखित केले.
परीक्षकांनाही साहित्य देण्यास विलंब!
युवा महोत्सवातील पहिल्याच लोकनृत्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी आलेल्या परीक्षकांना लागणारे साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आले नाही. परीक्षण तक्ता, पेन, पेन्सिल, अत्याधुनिक घडीसाठी काही वेळ परीक्षक अडून बसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.