अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जंयती वषार्चे औचित्य साधून ‘गांधी-१५०’ हा अभिनव उपक्रम प्रभात किड्स स्कूल येथे पालक-शिक्षक सभेच्या निमित्ताने शनिवार,२७ आॅक्टोबर रोजी पार पडला.या उपक्रमात प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन गांधीजींना मानवंदना दिली. गांधीजींच्या जीवनावरील विविध कार्यक्रमांमुळे अवघी शाळा गांधीमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा जीवनास नैतिक अधिष्ठान होते. त्यामुळे महात्मा गांधी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. महात्मा गांधी यांच्या विचारांची रुजवणूक व्हावी, या हेतूने प्रभातचा संपूर्ण परिसरच गांधीमय झाला होता. प्रभात प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी दांडी यांत्रा काढून वातावरणात मांगल्य निर्माण केले. गांधीजींनी चरखा स्वातंत्र्य लढ्याशी जोडून श्रमास प्रतिष्ठा दिली होती. ‘प्रभात’मध्येदेखील या उपक्रमातर्गत असलेल्या राष्ट्रपिता सुतकताई केंद्रास पालकांनी भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सुतकताई करुन महात्मा गांधी यांना मानवंदना दिली.प्रभातमध्ये भजन कट्टा करण्यात आला होता. त्यावर संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी भजन सादर केली. तर सामाजिक विज्ञान शाखा व नाट्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी गांधी यांच्या जीवनावर नाटुकले व मुकनाट्य सादर केले.