अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाअंतर्गत अकोला आगार क्र. १ च्या अकोला ते वाडेगाव बसला तांत्रीक कारणामुळे अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. बसने मागच्या बाजूने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखविल्यामुळे पुढील अनर्थ टळला व प्रवाशांचे प्राण वाचले.अकोला आगार क्र. १ येथे कार्यरत असलेले चालक सचीन हाताळकर आणि वाहक अनील रोकडे हे नेहमीप्रमाणे वाडेगाव येथे एमएच एस ८९४७ क्रमांकाची बस घेऊन गेले.
वाडेगाव येथून परत येताना शहरातील सिंधी कॅम्प परिसरात बसच्या मागच्या बाजूने धुर निघत असल्याचे रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वाराच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार बस चालक हाताळकर यांना सांगितला. हाताळकर यांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबविली. खाली उतरून पाहिले असता बसच्या मागच्या बाजूला टायरच्या घर्षनामुळे आग लागल्याचे त्यांना दिसून आले. चालक व वाहक दोघांनीही त्यांच्या जवळचे पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर त्यांनी तातडीने सर्व प्रवाशांना शांतपणे खाली उतरण्यास सांगितले. तत्पूर्वी, त्यांनी याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या बसद्वारे प्रवाशांना बसस्थानकाकडे रवाना केले.
चालक, वाहकाच्या प्रसंगावधाने टळला अनर्थअकोला ते वाडेगाव या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. वाडेगाव येथून परत येत असताना बसमध्ये ६० पेक्षा अधिक प्रवासी होते. बसच्या मागच्या बाजूच्या चाकाच्या घर्षनामुळे लागलेली आग चालक व वाहकाने वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. हा प्रकार लक्षात येण्यास आणखी थोडा विलंब झाला असता, तर आग अधिक भडकून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता आली नसती.