संतोष येलकर............
अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात स्थलांतरित मजूर कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये स्थलांतरित मजूर कुटुंबातील ८१२ बालके आढळून आली असून, या बालकांना अंगणवाडीच्या सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित बालकांची आरोग्य तपासणी व आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांमार्फत स्थलांतरित मजुरांच्या ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यात आले. वीटभट्टीवर काम करणारे मजूर तसेच कोरोना काळात रोजगार गेल्याने जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या मजूर कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सातही तालुक्यांत स्थलांतरित मजूर कुटुंबातील ८१२ बालके आढळून आली. या बालकांची संबंधित अंगणवाड्यांमध्ये नोंद करण्यात आली असून, त्यांना अंगणवाडीच्या सुविधा लागू करण्यात आल्या. त्यानुसार स्थलांतरित मजूर कुटुंबातील या बालकांना आरोग्य तपासणी, आहाराचे वाटप, वजन व उंचीच्या नोंदी घेणे इत्यादी सुविधा लवकरच लागू करण्यात येणार आहेत.
सर्वेक्षणात आढळून आलेल्या
बालकांची तालुकानिहाय संख्या !
तालुका बालके
अकोट ३८३
अकोला ग्रामीण १ ४१
अकोला ग्रामीण २ २४
तेल्हारा १०८
पातूर ४९
बार्शीटाकळी ७९
मूर्तिजापूर ४७
बाळापूर ८१
जिल्ह्यात स्थलांतरित मजूर कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये स्थलांतरित मजूर कुटुंबातील ८१२ बालके आढळून आली असून, त्यांची अंगणवाड्यांमध्ये नोंद करण्यात आली. तसेच त्यांना अंगणवाडीच्या सुविधा लागू करण्यात आल्या. त्यानुसार संबंधित बालकांची आरोग्य तपासणी व आहाराचे वाटप या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
-विलास मरसाळे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद.