अकोला : ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासाच्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांची जिल्ह्यात २१५ पदे रिक्त आहेत. ही पदे भरतीची प्रक्रिया महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत लवकरच सुरू होणार आहे. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून पदोन्नतीने थेट भरावयाच्या पदांबाबत माहिती मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची माहिती समितीच्या पहिल्याच सभेत देण्यात आली. पदे रिक्त असल्याने या विभागाकडे असलेल्या विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्याशिवाय गरोदर, स्तनदा माता, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, किशोरी योजना, कुपोषण रोखण्याचे उपक्रमही प्रभावित होत आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी शासनानेही ही पदे तातडीने भरण्याचा आदेश दिला आहे. भरती प्रक्रिया बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत केली जाईल. त्यापैकी अंगणवाडी सेविकांची पदे मदतनिसांना पदोन्नतीने थेट भरली जातील. त्यानंतर शिल्लक राहिलेली सेविकांची पदे व मदतनिसांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी विलास मरसाळे यांनी त्याबाबतची माहिती मागविली. तसेच पदोन्नती प्रक्रियेबाबत प्रकल्प स्तरावर नियोजनही करून दिले जाईल. जिल्ह्यातील आठही प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे, असे मरसाळे यांनी सांगितले.