लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत सहभागासाठी सातत्याने आदेश दिले जातात. यापुढे कोणत्याही योजना, उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून योजनाबाह्य कामे त्यांच्यावर सोपवू नये, असे आदेशच राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कमलाकर फंड यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांना आता बालकांचे आरोग्य आणि कुपोषणमुक्तीचे विविध कार्यक्रमच प्रभावीपणे राबवावी लागणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र व राज्य शासनाची योजना आहे. राज्यातील ग्रामीण, आदिवासी, शहरी भागात ती राबविण्यात येते. त्यातून सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, आरोग्यसेवा पुरविणे, पूर्वशालेय शिक्षण देणे, तीव्र कुपोषित, कमी वजनाची बालके यांच्या आरोग्य सुधारणेचा कार्यक्रम अंगणवाडी केंद्रातून राबविला जातो. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. तरीही वेगवेगळ्या मोहिमा, सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना जुंपले जाते. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियानातील गुड मॉर्निंग पथके, शेततळे सर्वेक्षण, आपत्ती निवारणाच्या कामांचा समावेश आहे. त्या कामांमुळे अनेकदा अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याची वेळ येते.त्यामुळे बालकांचे आरोग्य, पोषण तसेच महिला व किशोरी यांच्या मूळ योजना अंमलबजावणीवर परिणाम होतो. हा प्रकार यापुढे घडू नये, यासाठी सेविका, मदतनिसांना योजनाबाह्य कोणतीही कामे देऊ नये, असे आदेशच आयुक्त फंड यांनी दिले.
अंगणवाडी सेविकांची योजनाबाह्य कामातून सुटका
By admin | Published: July 17, 2017 3:22 AM