लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अंगणवाडी सेविकांना स्मार्ट वर्क करता यावे, यासाठी राज्य शासनाने मोबाइल दिले; मात्र नेटवर्कअभावी ग्रामीण भागातील सेविकांना आॅनलाइन कामे करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाचा स्मार्टवर्कचा मूळ हेतूच फसल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नाही. असेल तर नेटवर्क नाही, तर कुठे तासन्तास भारनियमनामुळे अंगणवाडी सेविकांना कामाचा अहवाल स्मार्ट मोबाइलद्वारे पाठविणे कठीण झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागात शहरापेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रे आहेत. सरकारने जूनपासून अंगणवाडीचा सर्व कारभार आॅनलाइन केला आहे. याबाबतचे प्रशिक्षणसुद्धा टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. काही ठिकाणी आॅनलाइन कामांना सुरुवातदेखील झाली आहे. या कामी शासनाकडून एप्रिल २०१९ मध्ये महिलांना मोबाइलसोबत सीमकार्ड दिलेले आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या इंटरनेट डाटाची पुढील सहा महिन्यांची अतिरिक्त रक्कम अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे; मात्र २० वर्षांहून अधिक काळ काम करणाºया सेविकांना स्मार्ट मोबाइल हाताळणे कठीण जात आहे. यासाठी इतरांची मदत घेतली जात आहे. स्मार्टफोन हाताळणे त्याचबरोबर रेंज नसणे, भारनियमन, इंटरनेटची सुविधा नसणे, आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडी सेविकांना माहिती गोळा करण्याऐवजी अनेकदा रेंजच्या शोधात अधिक पायपीट करावी लागते. आॅनलाइन अहवाल दररोज दिला जाणारा पूरक पोषण आहार, औषधांच्या नोंदी, बालकांचे वजन आणि उंचीच्या नोंदी, लसीकरण, स्तनदा माता गरोदर मातांच्या तसेच मुलींची नोंद याशिवाय परिसरातील कुटुंबीयांच्या नोंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा अहवाल त्या-त्या दिवशी संबंधित विभागाला मिळावा, यासाठी स्मार्ट मोबाइल देण्यात आले आहेत. नेटवर्कअभावी अहवाल पाठविण्यात अडचणी येत आहेत.