अकोला: अकोला महानगर काँग्रेस अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव चौधरी यांची नियुक्ती केल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी मुंबईकडे प्रयाण केले आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या सर्मथकांनी गुरुवारी दिवसभर नवीन महानगर अध्यक्षांच्या नियुक्तीविरोधात तयार केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्याची मोहीम राबविली. या निवेदनावर तब्बल चाळीसच्यावर जुन्या-नव्या नेत्यांचे स्वाक्षरी सर्मथन मिळविले असून हे निवेदन शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काँग्रेसच्या अकोला महानगर अध्यक्षपदासाठी पक्षातील दिग्गज इच्छुक होते. अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या पदावर सर्वसंमतीच्या नेत्याला संधी मिळेल अशी नेते व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नावाबाबत येथील पदाधिकार्यांसोबत चर्चाही केली होती. त्यामुळे ऐनवेळी बबनराव चौधरी यांचे नाव जाहीर झाल्यामुळे काँग्रेसमधील असंतोष उफाळून आला आहे. पक्षश्रेष्ठींनी चर्चेतील नावांनाही बाजूला सारल्याने महानगर पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या सर्मथकांनी थेट गुरुवारी दिवसभर प्रदेश कार्यालयात विविध माध्यमातून आपल्या भावना पोहचविल्या आहेत. या प्रकाराची दखल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा यांनीही घेतली असून त्यांनी गुरुवारी अनेक नेत्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्याची माहिती आहे.
नाराज काँग्रेस नेते कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना
By admin | Published: July 01, 2016 2:11 AM