अकाेला : महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माेर्णा नदीकाठचे पूरग्रस्त कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे समाेर आले. शिवसेनेचे शहरप्रमुख तथा मनपा गटनेता राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात साेमवारी संतप्त पूरग्रस्तांचा आक्राेश माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. या वेळी सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी निमा अराेरा यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. यानंतर अवघ्या तीन तासांत ४९९ पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश तयार करण्यात आले.
शहरात २१ जुलैच्या मध्यरात्री माेर्णा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक घरांची पडझड हाेऊन अन्नधान्याची नासाडी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. प्रभाग १७ अंतर्गत नदीकाठच्या रमाबाई आंबेडकर नगर, अण्णाभाऊ साठे नगर तसेच प्रभाग ९ अंतर्गत भगिरथ वाडी, आरपीटीएस भागातील नागरिकांची वाताहत झाली. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने चाेवीस तासांच्या आत पाच हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विलंब हाेत असल्याचे समाेर आले आहे. मागील ११ दिवसांपासून महसूल विभागाकडून आर्थिक मदतीसाठी टाेलवाटाेलवी हाेत असल्याचे पाहून साेमवारी सेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चाेपडे, युवासेना शहराध्यक्ष नितीन मिश्रा, योगेश गीते, रूपेश ढोरे, रोशन राज, देवा गावंडे, विक्की ठाकूर, गणेश बुंदेले, विश्वासराव शिरसाट, सुरेश इंगळे, गोपाळ लव्हाळे यांच्यासह पूरग्रस्त महिलांचा आक्राेश माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.
संतप्त महिलांची घाेषणाबाजी
पंचनामे केल्यानंतरही ११ दिवसांपासून महसूल प्रशासन आर्थिक मदतीसाठी झुलवत असल्याचा आराेप करीत संतप्त महिलांकडून प्रशासनाविराेधात प्रचंड नारेबाजी, घाेषणाबाजी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने मदत तर साेडाच, साधी विचारपूसही केली नसल्याचे सांगत महिलांना रडू काेसळले.
आमदार म्हणाले, ताेपर्यंत हलणार नाही!
जाेपर्यंत पूरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश दिले जात नाहीत, ताेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातून हलणार नसल्याचा पवित्रा आमदार देशमुख यांनी घेतला. जिल्हाधिकारी अराेरा महिलांच्या माेर्चातून वाट काढत बार्शिटाकळीला निघून गेल्यामुळे आ. देशमुख यांनी नापसंती व्यक्त केली.
...अन् प्रशासकीय यंत्रणा जागी झाली!
ज्या भागात घरांची पडझड झाली नाही, त्या भागात आर्थिक मदत कशी देण्यात आली, असे विचारत पूरग्रस्तांची यादी सादर करण्याची सूचना आ. देशमुख यांनी केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, तहसीलदार बळवंत अरखराव यांनी धावाधाव सुरू केली. त्यानंतर अवघ्या तीन तासांत ४९९ पूरग्रस्तांचे धनादेश तयार करून १२८ धनादेशांचे वाटप करण्यात आले, हे विशेष.