दिग्रस बु : सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक गावांत गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवसांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रात धडक देत वरिष्ठांना निवेदन देऊन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. दुसरीकडे, वीज बिल वाढून येत असल्याने ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले आहेत.
सस्ती येथील वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावांत मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या दरम्यान सरपटणाऱ्या प्राण्यांची (साप, विंचू आदी) भीती वाढली आहे. गावात वीज कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात यावा किंवा तांत्रिक कर्मचारी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गत दोन तीन दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त युवकांनी उपकेंद्रात धडक दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदन गवई, माजी उपसरपंच गोपाळ त्रंबक गवई, नारायण ताले, राजेंद्र कुकडकार, मिठाराम तायडे, प्रमोद किसन चिकटे, तुकाराम गवई, सुभाष बराटे, संतोष मसने, आकाश बाळू गवई, शिवहरी गवई, सावनकुमार गवई, शुद्धोधन गवई, विजय गवई, अंकेश गवई, शशी ताले, प्रवीण इंगळे, स्वप्नील धोत्रे, राहुल सोनोने, सुधाकर कराळे, रवींद्र गवई, रमेश गवई, राजेंद्र ताले, सतीश हातोले, कुंदन गवई, नागेश गावंडे, धीरज गवई आदींसह दिग्रस बु., तुलंगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
------------
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, सस्ती वीज उपकेंद्र वीज पुरवठा सुरळीत देण्यास अपयशी ठरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या दूर करावी.
-शुद्धोधन गवई, दिग्रस बु.
------------------
दिग्रस बु. गावात मागील चार महिन्यांपासून विद्युत कर्मचारी नसल्याने ग्राहकांना वीज समस्यांबाबत अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
- गोपाल त्रंबक गवई, दिग्रस बु.