अकोला : राज्याच्या मागासलेल्या भागात संकरीत पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय मागील १८ वर्षांपासून अकोला येथे कार्यरत आहे. ५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयातील साहित्य रविवारी हलविले जात असल्याची माहिती मिळताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप ठाेकून राज्य सरकारच्या विराेधात निदर्शने केली.
जुने आरटीओ रोड गोरक्षण रोड येथे कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार निदर्शने करत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात नगरसेवक गिरीश जोशी, मनीराम टाले, माधव मानकर, , देवाशीष काका, संतोष पांडे गणेश अंधारे मनोज शाहू अजय शर्मा विजय इंगळे बाळ टाले प्रशांत अवचार आकाश ठाकरे अभिजीत कडू देवेंद्र तिवारी डॉक्टर गौरव शर्मा बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ, राजे शिंदे, मनिष बाचोका, मनिष बुंदिले, मंगेश सांगा, रंजीत खेडकर, ओम कसले, विवेक देशमुख, संदीप गावंडे, आदींनी पशुसंवर्धन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठाेकले. खदान पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना अटक केली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी निषेध व्यक्त केला. रविवारी सुट्टी असताना हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची खरंच गरज होती का, असा सवाल सावरकर यांनी उपस्थित केला.