लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले. ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आश्वासनांच्या पलीकडे शासन ठोस निर्णय घेत नसल्यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सतत निवेदने देऊनही कर्मचार्यांच्या मुद्यावर तोडगा निघत नसल्याचे पाहून बेमुदत संपाचा बिगुल फुंकण्यात येत असल्याचे इंटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरड यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आली. सोमवारी मध्यरात्री अकोला आगारासह जिल्हाभरातील आगार, एसटी वर्कशॉप येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. वाहन, चालक तसेच यांत्रिक विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
मध्यवर्ती आगारचे कामकाज प्रभावितएसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मदनलाल धिंग्रा चौकातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगाराचे कामकाज प्रभावित झाले आहे. मध्यरात्रीपासून एसटीची चाके थांबल्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
आंदोलनाबाबत शासनाला यापूर्वीच कायदेशीर सूचना दिली होती. मात्र तरीही दखल न घेतल्याने संघटनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. ऐन दिवाळीत होत असलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होणार असल्याने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आंदोलन कोण्याही एका संघटनेच्या कर्मचार्यांसाठी नसून सर्वांसाठी आहे, हे महत्त्वाचे. -अनिल गरड, जिल्हाध्यक्ष इंटक संघटना-