अकाेला : शहरात २०१६ ते २०१८ या कालावधीत तयार करण्यात आलेल्या चार सिमेंट रस्त्यांची अवघ्या चार महिन्यांतच दुरवस्था झाली. या प्रकरणी अद्यापही मनपा प्रशासनाने बांधकाम विभागातील दाेषी अभियंते, कंत्राटदारावर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या वतीने मनपाच्या प्रवेशद्वारालगत सिमेंट रस्त्यांचे वर्षश्राद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत २०१२ मध्ये शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला ८ काेटींचा निधी प्राप्त झाला हाेता. त्या वेळी तत्कालीन आयुक्त दीपक चाैधरी यांनी डांबरीकरणासाठी १३ रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला हाेता. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी निविदा प्रसिद्ध केल्यानंतर ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करीत प्रस्तावित १८ फूट रुंदीचे सिमेंट रस्ते ५४ फूट रुंद केले. तसेच त्यामध्ये दुभाजकाचा समावेश करून एलईडी पथदिव्यांची व्यवस्था केली. यामध्ये टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चाैक ते वसंत देसाई स्टेडियम, माळीपुरा ते मोहता मिल, मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन, बाळासाहेब ठाकरे उद्यान ते कलेक्टर ऑफिस ते अशोक वाटिका अशा एकूण सहा रस्त्यांचे निर्माण करण्यात आले. यातील दाेन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आले हाेते. सदर रस्ते निकृष्ट असल्याचे चाैकशीत उघड झाल्यानंतरही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने दाेषींविराेधात कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ‘आप’च्या वतीने अभिनव आंदाेलन करण्यात आले. या वेळी अमरावती विभागाचे संयोजक शेख अन्सार, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, महानगर संयोजक खंडेराव दाभाडे, सहसंयोजक संदीप जोशी, गजानन गणवीर, काझी लायक अली, ठाकूरदास चौधरी, विजय भटकर, दर्पण खंडेलवाल, अनुराग झुणझुणवाला, रामेश्वर बढे, मो. अमीर, मोहन आमले, रवींद्र सावळेकर, हमीद भाई, जावेद खान, दिनेश विश्वकर्मा, सै. सलीम, सुधाकर अंभोरे आदी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
महापालिकेसमाेर निकृष्ट सिमेंट रस्त्यांचे वर्षश्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:04 AM