अकोला: शालेय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जातो. २६ जूनपासून शाळेच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने शनिवारी शाळांना नवीन वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागणार आहे; परंतु पोषण आहार देताना, शाळांकडून अनेकदा मेन्यु बदलविला जातो, त्यामुळे ठरलेला आहार विद्यार्थ्यांना दिला जातो की नाही, याची नियमित तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवारपर्यंत पोषण आहार उपलब्ध केला जातो. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शालेय शिक्षण विभागाने पोषण आहाराचे शाळांना नवीन वेळापत्रक तयार करून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबर््ंधित शाळांना दिला आहे. सोमवार व गुरुवारी विद्यार्थ्यांना वरण-भात किंवा डाळ मिश्रीत खिचडी(तांदूळ-तूर डाळ, मूग, मसूर डाळ), मंगळवार व शुक्रवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ, बुधवार व शनिवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ द्यावी. विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ देताना, शिक्षण विभागाने त्याचे प्रमाणसुद्धा ठरवून दिले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १00 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, २0 ग्रॅम, तेल २0 ग्रॅम, भाजीपाला ५0 ग्रॅम, तसेच इयत्ता सहावी ते आठवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १५0 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, ३0 ग्रॅम, तेल ७.५ ग्रॅम, भाजीपाला ७५ ग्रॅम उपलब्ध करून द्यावा. यासोबतच मीठ, हळद, मसाला, जिरे, मोहरीचेसुद्धा प्रमाण ठरवून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)