Akola West Assembly By Poll ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक तारखा जाहीर केल्या. यावेळी देशभरात बऱ्याच महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. देशातील एकूण २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहे. ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणार आहे त्यामध्ये बिहार, त्रिपुरा, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र , गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातीलअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ रिक्त होता. या जागेसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यावेळी म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू होणार आहे.
निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
राजीव कुमार यांनी निवडणूक तारखांची घोषणा करण्याआधी आयोगाने केलेल्या तयारीविषयी माहिती दिली. "मागील दोन वर्षांपासून आम्ही निवडणुकीसाठी तयारी करत होतो. ८५ वर्षांवरील व्यक्तींचे थेट घरी जाऊन मतदान घेणार आहोत. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय आणि व्हील चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मतदान केंद्र शोधणं सोपं होणार आहे. नो यूअर कँडिडेटच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराची माहिती मिळवणं शक्य होणार आहे. मतदार नोंदीसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. यंदाच्या निवडणुकीत १ कोटी ८२ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करतील," अशी माहिती कुमार यांनी दिली.
दरम्यान, "मतदानावेळी हिंसा होऊ नये, यासाठी आम्ही उपाययोजना केल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तिथं टीव्ही, सोशल मीडिया अशा विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींच्या किंवा घटनांच्या आधारे कारवाई केली जाईल," अशा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे.