अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या विदर्भाच्या सनियंत्रण समितीचे उप-महाव्यवस्थापक व अमरावती आणि नागपूर या दाेन ठिकाणचे विभाग नियंत्रक यांनी लाॅकडाऊनच्या काळात जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश केल्याप्रकरणी त्यांची खदान पाेलिसांनी साेमवारी दिवसभर चाैकशी केली. या तीनही अधिकाऱ्यांचे बयाण नाेंदविण्यात आले असून, खदान पाेलीस आता विश्रामगृहातील दस्तावेजांची पडताळणी करणार आहेत.
जगभर कोरोनाचे संकट भयंकर वाढले असताना, देशातही कोरोनाची मोठी लाट मार्च-एप्रिल महिन्यात आली होती. त्यामुळे २२ मार्चपासून राज्यभर कडक निर्बंध लादण्यात आले होते; मात्र असे असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या सनियंत्रण समिती क्रमांक ३ चे उप-महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अमरावती विभाग नियंत्रक श्रीकांत गभने आणि नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी लाॅकडाऊनचे नियम पायदळी तुडवीत विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केल्याची तक्रार शिवसेना नेते विजय मालाेकार यांनी खदान पाेलीस ठाण्यात केली हाेती. यावरून पाेलिसांनी तीनही बड्या अधिकाऱ्यांना नाेटीस बजावत चाैकशीसाठी हजर हाेण्याचा आदेश दिला हाेता. त्यानंतर साेमवारी या तीनही अधिकाऱ्यांनी खदान पाेलीस स्टेशनमध्ये हजर हाेत बयाण नाेंदविले. आता या प्रकरणाच्या चाैकशीला गती मिळाली असून, पाेलिसांनी विश्रामगृहाचे दस्तावेजही मागविले आहेत.
त्यामुळे या प्रकरणात आता लवकरच कारवाई हाेण्याची शक्यता आहे.
कोट
राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूरसह अमरावती विभागाचे बडे अधिकारी विना परवानगी अकाेल्यात आले हाेते. त्यांनी चाैकशीमध्ये एका तिसऱ्या प्रकरणात चाैकशीसाठी आल्याचे सांगितले असल्याची माहिती आहे; मात्र ज्या व्यक्तीच्या चाैकशीसाठी ते आले हाेते त्या काळात संबंधित व्यक्ती रजेवर हाेते. तर या प्रकरणात विभागीय लेखा विभाग आणि आस्थापना विभागातील दाेघांची चाैकशी केल्यास प्रकरणातील सत्यताच समाेर येणार आहे. या अधिकाऱ्यांना परवानगी नसतानाही ते दाखल झाले हाेते, हे सत्य लवकरच समाेर येणार आहे.
विजय मालोकार
तक्रारकर्ते तथा शिवसेना नेते.