अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असून, सोमवार, १८ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,१६९ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तुकाराम चौक येथील दोन, मलकापूर, मोठी उमरी, अमृतवाडी, आदर्श कॉलनी, बालाजी नगर, गिरी नगर, डाबकी रोड, रेणुका नगर, सिंधी कॅम्प, कौलखेड, राहुल नगर, जीएमसी हॉस्टेल, पातूर व जैन मंदीर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,१६९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.