अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, १२ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९८४६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ८७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये खडकी व कापशी येथील प्रत्येकी दोन, आलेगाव, आपातापा, बोरगाव खु., आस्टूल ता. पातूर, तेल्हारा, भौरद, जीएमसी हॉस्टेल, उरळ, जवाहर नगर, मयूर कॉलनी, न्यू राधाकिशन प्लॉट व गायगाव येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.