अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २६ डिसेंबर रोजी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०३३३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी १९५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खडकी येथील तीन, मोठी उमरी येथील दोन, कंगरवाडी, कावसा, जुने शहर, खोलेश्वर, दुर्गा चौक, टॉवर चौक, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, दानापूर ता. तेल्हारा, बार्शीटाकळी, देशमुख फाईल आणि मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
६५५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६५५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.