अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, १८ डिसेंबर रोजी आणखी २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १००७३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील सहा, जूने राधाकिशन प्लॉट येथील तीन, खरप रोड व सोपीनाथ नगर येथील प्रत्येकी दोन, तरपारस, सिध्दी कॅम्प, आदर्श कॉलनी, मलकापूर, मोठी उमरी, लहरीया नगर, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, उरळ ता. बाळापूर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
७४५ अॅक्टिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००७३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०२२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७४५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.