बुलडाणा : ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना गावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय शासनाने २३ जून रोजी घेतला. सध्या ६२५ बसद्वारे ही सेवा दिली जाते. नवीन बसेसमुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत होणार आहे. मानव विकास मिशनद्वारे २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यात मिशनव्दारे विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. या तालुक्यांत आरोग्य सेवा पुरविणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, दरडोई उत्पन्न वाढवणे, यासाठी मदत केली जाते. घरापासून शाळेपर्यंंतचे अंतर जास्त असल्याने अनेक मुली शाळा सोडून देतात. काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचाही प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी मोफत बससेवा पुरवली जाते. हा उपक्रम चार वर्षापासून सुरू असून सध्या ६२५ बसमधून मुली शाळेत जातात. या बसची बांधणी आणि सेवा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येते. या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय मिशनने घेतला. त्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षात या नवीन बसेस विद्यार्थींंनीच्या सेवेत दाखल होणार आहे. विद्यार्थींंनीसाठी मोफत बस प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच नवीन बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
*एक लाख विद्यार्थीनींची सोय
मानव विकास मिशनच्या अंतर्गत राज्यात सध्या ६२५ बसेस धावत आहेत. या बसमधून सातवी ते बारावीपर्यंंंतच्या विद्यार्थीनींना गाव ते शाळेपयर्ंत मोफत प्रवास करण्याची सोय आहे. या योजनेतून प्रत्येक तालुक्यात किमान पाच बस देण्यात आल्या आहेत. दहा ते पंधरा गावासाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला आहे. सध्या सुमारे ७0 ते ७२ हजार विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ होत असून नवीन बसमुळे आणखी ३0 हजार विद्यार्थीनींची सोय होणार आहे.