अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पाॅझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जीएमसीतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांचा आकडा ५२ वर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले असून पुढील आदेशानंतरच महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांनी सांगितले. गत वर्षीच्या कोविड काळानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे नवे सत्र नुकतेच सुरू झाले. एमबीबीएसच्या प्रथम वर्षीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्गही सुरू झाले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थी पॉझिटिव्ह येवूनही महाविद्यालयातर्फे अभ्यासवर्ग सुरूच ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी आणखी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने कोविड बाधित रुग्णांचा आकडा २५ वर पोहोचला. मंगळवारी रात्री आणखी २७ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या ५२ वर पोहोचली. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाविद्यालय प्रशासनातर्फे अभ्यासवर्ग बंद करण्यात आले. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वच विद्यार्थींचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दर चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांची तपासणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महाविद्यालय प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांची दर चौथ्या दिवशी स्क्रिनिंग केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळून येत आहेत, अशा रुग्णांची तत्काळ चाचणी केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण हे वसतीगृहातीलच असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत जीएमसीतील ५२ विद्यार्थ्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना कोरोनाचे कुठलेच लक्षण नाही. त्यांची प्रकृती उत्तम आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविद्यालयातील अभ्यासवर्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
- डॉ. मिनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी,अकोला