अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, शनिवारी (२३ जानेवारी) आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,३३८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२०८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट, वानखडे नगर, मुंडगाव ता. अकोट व दिपक चौक येथील प्रत्येकी दोन, श्री समर्थ प्रा. स्कूल, रेणुका नगर, जि.प. तांदळी, जि.प. नागोली, जि.प. शाळा माना, जि.प. शाहा वाईमाना, जि.प. शाळा अकोली जहागीर, कंझरा ता. मूर्तिजापूर, सिरसो ता. मूर्तिजापूर, कोळंबी ता. मूर्तिजापूर, तारफाईल, गोरेगाव, दाळंबी, सांगळुद, रामापूर ता. अकोट, पार्वती नगर, कौलखेड, सुधीर कॉलनी, सिंधी कॅम्प, द्वारका नगरी, राम नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी अकोट येथील तीन, जि.प. शाळा सातारगाव, सावरा, राधाबाई बकाल विद्यालय लोहारा, उरळ बु., यशवंत लेआऊट, आदर्श कॉलनी, आंबोडा ता. अकोट, केशवराज वेटाळ ता.अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३६ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६२३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,३३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.