अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असून, गुरुवार, दि. १४ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये नऊ अशा एकूण ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,०४९ वर पोहोचली आहे. दरम्यान, ३६ जणांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकीरोड येथील चार, सहकारनगर, चिंतामणीनगर व जुने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर येथील दोन, तर कौलखेड, अकोट, शिवर, सराफा बाजार, जुने खेताननगर, तोष्णीवाल ले-आउट, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, जठारपेठ व न्यू तापडियानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
३६ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, उपजिल्हा रुग्णालय येथून एक, अकोला ॲक्सिडेंट क्लिनिक येथून तीन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १३ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,०४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,१२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६०२ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.