अकोला : एमआयडीसी परिसरातील बियाणी दाल मिलमधून तब्बल ८0 कट्टे तूर डाळ लंपास करणार्या आणखी एका आरोपीस सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शिताफीने अटक केली. सदर आरोपी हा तूर डाळ ट्रकमध्ये घेऊन जाणारा ट्रकचालक असल्याची माहिती असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील बियाणी दाल मिल येथून तीन ते चार महिन्यांपूर्वी ८0 कट्टे तूर डाळ चोरीला गेली होती. या प्रकरणी बियाणी यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतर शोध घेत असताना तूर डाळ चोरीतील दोन आरोपींना अटक केली. या दोघांच्या माहितीवरून तूर डाळीची वाहतूक करणारा ट्रकचालक वैभव पाथरे रा. अमरावती याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. ८0 कट्टे तूर डाळ जप्त करण्यात सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार घनश्याम पाटील यांना यश आले आहे. तूर डाळ चोरी प्रकरणातील आणखी आरोपी सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार घनश्याम पाटील यांनी दिली. तूर डाळीचे भाव गगनाला भिडले असताना एमआयडीसीतून तूर डाळ चोरीला जाण्याचे दोन ते तीन प्रकार घडले होते. यामधील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून, तूर डाळही जप्त करण्यात आली आहे.
तूर डाळ चोरणारा आणखी एक आरोपी जेरबंद
By admin | Published: April 30, 2016 1:41 AM