अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी मुर्तीजापूर तालुक्यातील महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३३७ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ११ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,६४९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित ६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये देऊळगाव येथील तीन, तर भंडाराज बु., गीता नगर, डोंगरगाव, तापडीया नगर, लहान उमरी, डाबकी रोड, जठारपेठ व कापशी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७२ वर्षीय महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रामटेक ता. मूर्तिजापूर येथील ७२ वर्षीय महिलेचा मंगळवारी मुत्यू झाला. त्यांना २६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
७१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १०,६०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.