- संतोष येलकर
अकोला: भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत, राज्यात वंचित बहुजन आघाडीची पक्ष बांधणी सुरू करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीतून वेगवेगळ्या वंचित समूहांना जोडण्याचा ‘सोशल इजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग राबविण्यात येत आहे.बहुजन समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी यापूर्वी अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाची निर्मिती केली. अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भारिप -बमसंचे पक्ष संघटन उभे करण्यात आले. बहुजन महासंघाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध घटकांना सोबत घेण्याच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या या पहिल्या प्रयोगात बहुजन समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन पक्षसंघटन वाढविण्यात भारिप-बमसंला यश मिळाले. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडीच्या नावानेच राज्यात लोकसभा निवडणूक लढविण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून, राज्यात वंचित बहुजन आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हानिहाय ‘वंचित’च्या कार्यकारिणी गठित करण्याचे कामही सुरू करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हानिहाय कार्यकारिणींमध्ये वेगवेगळ्या वंचित घटकातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेच्या कामाची संधी देण्यात येत आहे. त्यानुषंगाने वंचित घटकांना सोबत घेऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीतून राज्यात ‘सोशल इंजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग राबविण्यात येत आहे.विदर्भातील नऊ जिल्ह्यांत ‘वंचित’च्या कार्यकारिणी गठित!राज्यात वंचित बहुजन आघाडीची पक्ष बांधणी सुरू करण्यात आली असून, जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येत आहेत. त्यामध्ये १७ आॅगस्टपर्यंत विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली इत्यादी नऊ जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आल्या आहेत. कार्यकारिणीमध्ये वेगवेगळ्या वंचित समूहातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेश प्रमुख राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले.