अकोला : स्वाइन फ्लूने आतापर्यंत जिल्हय़ात चार रूग्णांचा बळी घेतला असून, रुग्णांची संख्या अद्याप वाढतच आहे. शनिवारी आणखी एक रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला असून, संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालय व खासगी रुग्णालयात अकोला, वाशिम व बुलडाणा येथील स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी अविनाश रमेश घायल (१0, वडगाव, संग्रामपूर, बुलडाणा) यांच्या नमुन्यांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गोरक्षण रोडवरील रहिवासी परी उमेश पाटील (३), भास्कर विठोबा पोखरे (३९) रा. गणेशपूर खामगाव, प्रशांत गोपाल शेळके (३२) रा. तुकाराम चौक, रिना दीपक ठाकरे (३२), जिल्हा परिषद कॉलनी खडकी यांच्यावरही उपचार सुरू असून, संशयित असलेल्या शिवसेना वसाहत येथील रहिवासी उत्तम सुखदेव बायस्कर (६८) यांची प्रकृती शनिवारी खालावली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, वातावरणातील गारवा स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक झाला आहे. या वातावरणामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. या रुग्णांव्यतिरिक्त पल्लवी जनार्दन बोदडे (१७, अकोली रूपराव, तेल्हारा), मयूरी रामेश्वर सोळंके (3, बारखेड, खामगाव) आणि अनिकेत देवलाल वक्टे (१, कारंजा रमजानपूर, बाळापूर) यांनाही स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.
आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By admin | Published: March 15, 2015 12:10 AM