अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, २६ डिसेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३१६ झाला आहे. तर आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,३३३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी १९५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खडकी येथील तीन, मोठी उमरी येथील दोन, कंगरवाडी, कावसा, जुने शहर, खोलेश्वर, दुर्गा चौक, टॉवर चौक, आळशी प्लॉट, मूर्तिजापूर, दानापूर ता. तेल्हारा, बार्शीटाकळी, देशमुख फैल आणि मूर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
शनिवारी अकोला शहरातील मोहिते प्लाॅट भागातील ८० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. अ त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
१३१ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १४, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक व हॉटेल रिजेन्सी येथून दोन, तर होम क्वारंटीन असलेले १०६ अशा एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५२३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५२३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.