अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. गुरुवार, २१ जानेवारी शहरातील आणखी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३३० वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,२७९ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ज्योती नगर येथील चार, डाबकी रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, तुकाराम चौक, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प, वाशिम रोड, खानापूर, मलकापूर, आसेगाव बाजार, जठारपेठ, बाळापूर, आदर्श कॉलनी, राम नगर, मलकापूर रोड, जुने शहर, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी मूर्तिजापूर येथील तीन, तर आदर्श कॉलनी, केशव नगर, एरंडा व कृषी नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
६६ वर्षीय महिलेचा मृत्यू
गुरुवारी लक्ष्मी नगर, खदान, अकोला येथील ६६ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३६ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६१३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२७९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,३३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.