अकोला : गत चार महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर १७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या बळींचा आकडा ११४ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या २९०७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ९६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये चार जण बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील असून, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण अकोट, दोन जण तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील आहेत. याशिवाय सिव्हील लाईन, जठारपेठ, जीएमसी वसतीगृह, रामनगर, माधवनगर, दत्त नगर आणि मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.जठारपेठेतील ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच असून, गुरुवारी रात्री ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील रहिवासी असून, त्यांना २८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.४८९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:27 PM