अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. रविवार, २० डिसेंबर रोजी तेल्हारा तालुक्यातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३११ वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०१६९ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ४६९ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ४७ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ४४९ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये केशव नगर येथील पाच, राम नगर येथील चार, रणपिसे नगर, कौलखेड, गौरक्षण रोड व खेतान नगर येथील प्रत्येकी तीन जण, सिध्दी कॅम्प व बिर्ला रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, आरोग्य नगर, जीएमसी हॉस्टेल, मोठी उमरी, उरळ ता. बाळापूर, कृषि नगर, पत्रकार कॉलनी, आळशी प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, तापडीया नगर, तेल्हारा, हरिश कॉलनी, छोटी उमरी, डोंगरगाव, आदर्श कॉलनी, पारस, अकोट, सिंधी कॅम्प व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी गोरक्षण रोड येथील दोन, तर मोठी उमरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दहीगाव येथील वृद्धाचा मृत्यू
रविवारी तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील ६७ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना १८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
१७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तर युनिक हॉस्पिटल येथून एक, अशा एकूण १७ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७९१ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,१६९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७९१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.