लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहरात धुमाकूळ घालणार्या स्वाइन फ्लू या आजाराने सोमवारी आणखी एक बळी घेतला. शहरातील एका खासगी इस्पितळात गत १५ दिवसांपासून ‘स्वाइन फ्लू’आजारावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाचा सोमवार, २0 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सवरेपचार रुग्णालयात स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण दाखल असल्याची माहिती मंगळवारी समोर आली.एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अकोला शहरात या आजाराने थैमान घालून अनेक बळी घेतले. मध्यंतरी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले नाही; परंतु गत काही दिवसांपासून या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित भागात राहणार्या वृद्ध व्यक्तीस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर शहरातील एका नामांकित खासगी इस्पितळात भरती करण्यात आले होते. सदर वृद्धाच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, त्याचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान सोमवार, २0 नोव्हेंबर रोजी सदर वृद्धाचा मृत्यू झाला. दरम्यान, सवरेपचार रुग्णालयातील विशेष कक्षात स्वाइन फ्लूच्या तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ७0 वर्षीय वृद्ध आणि १६ वर्षांच्या दोन तरुण रुग्णांचा समावेश आहे. या तिघांचेही स्वॉबचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर त्यांची स्थिती स्पष्ट होईल. सध्या तिघांचीही प्रकृती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वाइन फ्लूचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळून आल्यास आजारपण अंगावर न काढता, तातडीने डॉक्टरांना दाखवावे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.