मूर्तिजापूर : पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या वन्यजीवाची कुत्र्यांकडून शिकार होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बुधवारी संध्याकाळी शेलू वेताळ शिवारात कुत्र्यांनी काळविटाची शिकार करुन ठार केल्याची घटना घडली. पाच दिवसातील ही दुसरी घटना आहे.
पाण्याच्या शोधात वन्यजीवाची भटकंती होत आहे. बुधवारी शेलू वेताळ येथील गावाला लागून असलेल्या पंजाबराव दोड यांच्या बागायीत शेतात पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटाचा पाठलाग करुन ठार केले. घटनेची माहिती पंजाबराव दोड यांनी सर्पमित्र संजय दोड यांना दिली. संजय दोड यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावरकर यांना बोलावून काळविटावर उपचार करण्याचा प्रयत्न केला असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या बाबत वनविभागाला माहिती देऊन सदर मृत काळविटाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. २८ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावरील वखार महामंडळाच्या गोडाऊन जवळ अशाच पद्धतीने एक काळविटाची कुत्र्यांनी शिकार केल्याची घटना घडली एकाच आठवड्यात ही दुसरी घटना समोर आली आहे.