अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार ३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दाखल करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ मार्चपासून सुरू झाली असून, त्यामध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
शुक्रवार २९ मार्च रोजी सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद होती. शनिवार ३० मार्च रोजी अकोला मतदारसंघातून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष उमेदवार मुरलीधर पवार यांच्या उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ॲड. आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषदेचे सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व सिद्धार्थ सिरसाट यांनी प्रस्तावक व सूचक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत असून, रविवार ३१ मार्च रोजी सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
२४ इच्छुक उमेदवारांनी घेतले ५१ अर्ज !अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवार ३० मार्च रोजी २४ इच्छुक उमेदवारांनी ५१ उमेदवारी अर्जांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उचल केली. यापूर्वी २८ मार्च रोजी २२ इच्छुक उमेदवारांकडून ३८ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली होती. त्यामुळे ३० मार्चपर्यंत मतदारसंघात ४६ इच्छुक उमेदवारांकडून ८९ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली असून, त्यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारपासून होणार गर्दी !उमेदवारी दाखल करण्याची मुदत गुरुवार ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार १ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे.